छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
मुकुंदवाडी परिसरातील २२ वर्षीय तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिस तपासात ही ‘मिसिंग’ केस नसून प्रेमविवाहाची असल्याचे उघड झाले. कावेरी (नाव बदलले) या तरुणीने मालेगाव येथील २६ वर्षीय योगेश (नाव बदलले) याच्याशी रीतसर नोंदणीकृत विवाह करून नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.

कावेरी पदवीधर असून शॉर्टहँडचे शिक्षण घेत होती. क्लासला जाते असे सांगून ती घराबाहेर पडली, मात्र त्या दिवशी ती परत आलीच नाही. ९ डिसेंबर रोजी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक तपास करत कावेरीचा मोबाइल बंद असल्याचे निदर्शनास आणले. तपासादरम्यान योगेशचा इन्स्टाग्राम आयडी सापडला आणि त्यातून संपूर्ण प्रकरण उघड झाले.
पोलिसांशी संपर्क साधताच योगेशने कावेरीसोबत केलेल्या नोंदणीकृत विवाहाचे प्रमाणपत्र सादर केले. कावेरीशी थेट संवाद साधण्यात आला असता तिने स्पष्ट शब्दांत पालकांना सांगितले की, तिने स्वतःच्या इच्छेने लग्न केले असून ती सुखात आहे आणि घरी परतण्याची इच्छा नाही.
कावेरी व योगेश दोघेही सज्ञान असल्याने आणि सर्व कागदपत्रे कायदेशीर असल्याने पोलिसांनी पालकांची समजूत काढत तपास पूर्ण केला. एका बाजूला मुलीने स्वतःच्या आयुष्याचा घेतलेला धाडसी निर्णय, तर दुसऱ्या बाजूला मुलगी घरातून निघून गेल्याने रिकामा झालेला घरातील कोपरा—अशा भावनिक वातावरणात या प्रकरणाचा शेवट झाला.



