रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील निंभोरा बु. येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघोदा–निंभोरा रस्त्यावरील दसनूर फाट्याजवळ झालेल्या चारचाकी वाहन अपघातात कारमधून बाहेर पडताना युवक शेतातील विहिरीत पडून मृत्युमुखी पडला. ही घटना दि. २८ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक विलास चौधरी (वय १९, रा. निंभोरा बु.) हा आपल्या मित्रांसोबत सावदा येथून कार (क्रमांक एम.एच. १३ बी.एन. ९०९१)ने निंभोऱ्याकडे परत येत होता. कार संस्कार प्रकाश चौधरी चालवत होता. दसनूर फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. अपघातानंतर कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना दीपक चौधरी याचा शेतातील विहिरीत पडल्याने जागीच मृत्यू झाला. या अपघातात संस्कार चौधरी, कुणाल शरद बारबंद, शुभम दत्तू दोडके, नितीन अरुण चौधरी व गणेश अशोक कुंभार हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी नथू रामभाऊ चौधरी यांनी दिलेल्या माहितीवरून निंभोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.



