धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील सोनवदजवळील विहीर फाटा येथे पूर्ववैमनस्यातून एकाची कुटुंबीयांसमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
गोपाल सोमा मालचे (रा. वाकटुकी, ह. मु. करमूड, ता. चाळीसगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर, राहुल सावंत (वय २६, रा. वाकटुकी, ता. धरणगाव असे संशयिताचे नाव आहे. राहुल याच्या वडिलांचा २०१० साली खून झाला होता. या खून खटल्यातून गोपाल मालचे यांची निर्दोष मुक्तता झाली होती. यात, गोपाल यांच्या कपाळाच्या मधोमध गोळी लागल्याने ते जागीच गतप्राण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मंगळवारी सायंकाळी गोपाल मालचे हे खामखेडे येथे साडू विनायक विक्रम ठाकरे यांना भेटण्यासाठी कुटुंबासह आले होते. त्यांना भेटून ते परत जात असताना राहुल याने त्यांना विहीर फाट्याजवळ गाठत त्यांची कार थांबवून गोळीबार केला. खूनाच्या घटनेनंतर संशयित आरोपी राहुल सावंत हा स्वतः धरणगाव पोलिस ठाण्यात हजर झाला व त्याने घटनेची माहिती दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते
