जळगाव : प्रतिनिधी
शहरातील गर्दीच्या ठिकाणांवरून दुचाकी चोरी करून पोलिसांना आव्हान देणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. काशिनाथ चौकातून चोरीला गेलेली हिरो होंडा सुपर स्प्लेंडर दुचाकी हस्तगत करत पोलिसांनी दोन अट्टल चोरांना अटक केली आहे. अटकेतील आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील फिर्यादी शालिक पाटील (रा. धानोरा खु., ता. जळगाव) हे आपल्या मालकीची हिरो होंडा सुपर स्प्लेंडर (MH-19-AK-0207) घेऊन काशिनाथ चौकात काही कामानिमित्त आले होते. त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला पार्क करून खरेदीसाठी गेले असता, अज्ञात चोरट्याने संधी साधून दुचाकी लंपास केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलिसांनी तपासाला वेग दिला. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार तसेच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर जाधव आणि राजेंद्र पाटील यांच्या मदतीने संशयितांची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी आतिष जितेंद्र पोथीवाल (रा. कांचन नगर, जळगाव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
कसून चौकशीत आतिषने हा गुन्हा साकेगाव (ता. भुसावळ) येथील त्याचा साथीदार गणेश लक्ष्मण कोळी याच्या मदतीने केल्याचे उघड केले. त्यानुसार पोलिसांनी गणेश कोळी यालाही अटक करून दोघांच्या ताब्यातून चोरीची दुचाकी हस्तगत केली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस अधिकारी राहुल तायडे, चंद्रकांत धनके, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, गणेश ठाकरे, राहुल घेटे आणि योगेश घुगे यांचा समावेश होता.


