Home » राष्ट्रीय » “शरद पवारांचा फडणवीसांना टोला : ‘नेपाळमध्ये काय झालं ते बघा, शहाणपणा शिकावा लागेल'”

“शरद पवारांचा फडणवीसांना टोला : ‘नेपाळमध्ये काय झालं ते बघा, शहाणपणा शिकावा लागेल'”

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे आज दिनांक १५ रोजी नाशिक येथे ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना पक्षाचे नेते आणि खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शब्दांनी टीका केली.

“नेपाळमध्ये गेल्या आठ दिवसात काय घडलं हे पाहा. एक भगिनी आली आणि तिच्या हाती राज्य देण्यात आलं. त्याचा अर्थ काय हे सांगायची गरज नाही. देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी यावरून शहाणपणा शिकतील अशी आशा आहे,” असे म्हणत पवारांनी फडणवीस यांना टोला लगावला.

त्याचबरोबर फडणवीस यांच्या पोस्टरबाजीवरही त्यांनी कडवट भाष्य केलं. “देवाभाऊ, सगळ्या महाराष्ट्रात आपली पोस्टरं लावलीत. शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याचे दाखवलं. महाराजांच्या काळात फाळ नव्हता, पण त्यांना सोन्याचा फाळ दिला. पण बळीराजा उपाशी राहतो, हे पाहून काहीच बदल झालेला दिसत नाही,” असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. “गेल्या दोन महिन्यांत २ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ – अशा परिस्थितीत राज्यकर्त्यांनी जबाबदारी घ्यायला हवी, पण ती घेतली जात नाही,” अशी टीका करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला की, “शेतकऱ्यांच्या आक्रोशाची दखल न घेतल्यास मोर्चा अधिक उग्र होईल.”

आपल्या कृषी मंत्रिपदाच्या काळातील अनुभव सांगताना पवार म्हणाले की, “मी मंत्री असताना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची भेट घेतली. त्यांच्या वेदना समजून घेतल्या. त्यानंतर आम्ही ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. कारण कर्जबाजारीपणा हा मोठा रोग आहे आणि त्यावर उपाय करणे गरजेचे आहे.”

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *