Home » महाराष्ट्र » ठाकरे गट युतीच्या चर्चांना वेग; अनिल परब–राज ठाकरे भेटीने राजकीय हालचालींना उधाण !

ठाकरे गट युतीच्या चर्चांना वेग; अनिल परब–राज ठाकरे भेटीने राजकीय हालचालींना उधाण !

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रात महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर आपला महापौर बसवण्यासाठी शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोरदार चढाओढ सुरू आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात संभाव्य युतीची चर्चा जोर धरू लागली आहे.

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यापासून ठाकरे बंधूंच्या भेटी-गाठी वाढल्याचे चित्र असून, या भेटीत मनसे–ठाकरे गट युतीच्या शक्यतेवर सविस्तर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, जागावाटपाचा अंतिम तोडगा निघेपर्यंत युतीची अधिकृत घोषणा होणार नाही, असे सूत्रांकडून समजते.

दरम्यान, या भेटीनंतर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत दिले. “युतीसंदर्भातील चर्चा चांगल्या वातावरणात सुरू असून सर्व पातळ्यांवर काम सुरू आहे. युती कधी जाहीर होईल, हे सध्या सांगणे कठीण आहे. याबाबत योग्य वेळी राज ठाकरे स्वतः माहिती देतील,” असे सरदेसाई म्हणाले. दुसरीकडे, सत्ताधारी महायुतीमध्येही मुंबई महापालिकेवरून अंतर्गत मतभेद समोर येत आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जागावाटपावरून चर्चा सुरू असून, सध्या 130 जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित 77 जागांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती भाजप नेते अमित साटम यांनी दिली आहे. एकीकडे संभाव्य मनसे–ठाकरे गट युती आणि दुसरीकडे महायुतीतील अंतर्गत तणाव, यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक यावेळी अधिकच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *