जळगाव : प्रतिनिधी
कामानिमित्त घरातील सर्व सदस्य बाहेर गेलेले असताना बंद घराला अचानक आग लागून टीव्ही, फॅन, कपडे, भांडी यासह घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना ३० जानेवारी रोजी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती घरमालकाने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबा येथील रहिवासी सुनील लहू सोनवणे (वय ४८) हे मजुरी काम करतात. कामानिमित्त ते व कुटुंबातील अन्य सदस्य घराबाहेर गेलेले असताना बंद असलेल्या घरातून अचानक धूर येऊ लागला. ही बाब लक्षात येताच परिसरातील रहिवाशांनी घरमालकास माहिती दिली.
आग वाढत असल्याने शेजारील नागरिकांनी तातडीने पाणी मारून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत घरातील टीव्ही, सिलिंग व टेबल फॅन, पलंग, भांडी, कपडे यासह संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीत घरातील सर्वकाही नष्ट झाले असून केवळ अंगावरील कपडे शिल्लक राहिल्याने आपला संसार उघड्यावर आला असल्याची भावना घरमालक सुनील सोनवणे यांनी व्यक्त केली. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.



