जळगाव : प्रतिनिधी
दारू पिण्यास पैसे न दिल्याने अमजद खान अमीर खान (वय ३६, रा. लक्ष्मीनगर) यांना चॉपरचा धाक दाखवून गळ्यातील चांदीची चेन आणि खिशातून १ हजार २८० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर फायटरने डोक्यात मारून दुखापत केली. ही घटना १७ फेब्रुवारी रोजी जुने बस स्थानकामागे घडली. याप्रकरणी तनवीर उर्फ तन्या शेख (२०, रा. गेंदालाल मिल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगरातील अमजद खान अमीर खान हे १७ रोजी पावणेबारा वाजेच्या सुमारास जुने बसस्थानकाच्या मागील बाजूने जात असताना तनवीर शेख याने अमजद खान यांची दुचाकी अडवली. तनवीर याने चॉपरचा धाक दाखवून खान यांचा एकूण १९ हजार ४८० रुपयांचा ऐवज जबरीने काढून घेतला. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.



