Home » राज्य » कात्रजमध्ये थरारक अपघात : भरधाव डंपरची ५ वाहनांना धडक; बोगद्याजवळ पेट घेऊन जळून खाक !

कात्रजमध्ये थरारक अपघात : भरधाव डंपरची ५ वाहनांना धडक; बोगद्याजवळ पेट घेऊन जळून खाक !

पुणे : वृत्तसंस्था

पुणे-सातारा महामार्गावरील कात्रज येथील जांभुळवाडी बोगदाजवळ आज सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील डंपरने समोरील चार ते पाच वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. धडकेनंतर काही क्षणांतच डंपरने अचानक पेट घेतल्याने तो पूर्णपणे जळून खाक झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अनियंत्रित डंपरने समोरील वाहनांना अक्षरशः उडवून दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. धडकेचा वेग इतका जबरदस्त होता की अपघातानंतर लगेचच डंपरला आग लागली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत ४ ते ५ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात संबंधित वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, जांभुळवाडी बोगदा, नवले ब्रिज आणि वडगाव ब्रिज हा पट्टा अपघातांचे केंद्र ठरत असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वीच नवले ब्रिजवर झालेल्या कंटेनर-कार अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *