भुसावळ : प्रतिनिधी
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान सिंधी कॉलनी परिसरात ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले. या कारवाईत एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला दि. २१ रोजी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोउनि. शरद बागल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. सिंधी कॉलनीतील नवजीवन सोसायटी येथे प्रकाश हुंदामल कारडा (५५) आणि रणजीत चत्रभान हंडी (३५, रा. गणपतीनगर, जळगाव) हे दोघे ऑनलाइन सट्टेबाजी करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून मोबाइल, लॅपटॉपसह १,०५,००० रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले.
या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात सीसीटीएनएस गु.र.नं. ४५८/२०२५ महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, रवी नरवाडे, पोहेकॉ. उमाकांत पाटील, पोना. विकास सातदिवे, पोकॉ. राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी, मपोकॉ. दर्शना पाटील, भरत पाटील आदींनी सहभाग घेतला
