Home » जळगाव » नेरी नाका परिसरात अज्ञात हल्लेखोरांचा रिक्षाचालकावर धारदार चॉपरने हल्ला !

नेरी नाका परिसरात अज्ञात हल्लेखोरांचा रिक्षाचालकावर धारदार चॉपरने हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील नेरी नाका परिसरात पॅजो रिक्षाचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून तिघा अज्ञात हल्लेखोरांनी रिक्षाचालकावर धारदार चॉपरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना १६ तारखेला सायंकाळी आठ वाजता घडली. या हल्ल्यात मुन्ना रमजान पिंजारी (वय ३६, रा. बिलाल चौक, तांबापुरा) गंभीर जखमी झाले असून त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुन्ना पिंजारी यांच्याकडे पॅजो रिक्षा असून ते अॅपे रिक्षा (क्र. एमएच १९ एस २३८८) मधून पाण्याचे जार वितरित करण्याचे काम करतात. १६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नेरी नाका परिसरातून घरी जात असताना त्यांच्या रिक्षाचा धक्का तेथून जाणाऱ्या तिघांना लागला. या कारणावरून त्या तिघांनी पिंजारी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

वाद चिघळल्यानंतर हल्लेखोरांनी पिंजारी यांच्या रिक्षाची काच फोडून तोडफोड केली. यापैकी एकाने स्वतःचे नाव शुभम असल्याचे सांगत “मी कासमवाडीचा दादा आहे” अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने जवळील धारदार चॉपरने पिंजारी यांच्या पार्श्वभागावर वार केला. तसेच जीवेठार मारण्याची धमकी देत तिघेही घटनास्थळावरून पसार झाले.

चॉपरच्या वारामुळे गंभीर जखमी झालेल्या पिंजारी यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांनी १७ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध भादंवि कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी करीत असून आरोपींचा शोध सुरू आहे. किरकोळ धक्क्यावरून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *