मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात हिवाळ्याची चाहूल आता प्रत्यक्ष जाणवू लागली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये रात्री आणि पहाटे गार वारे सुटायला सुरुवात झाली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमान झपाट्याने घसरत आहे. हवामान विभागाने पुढील सात दिवसांत तापमानात आणखी ४ ते ५ अंश सेल्सियसने घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील तापमान घटत असून, पुणे जिल्ह्यात पहाटेचे तापमान तब्बल १० अंश सेल्सियसपर्यंत खाली आले आहे. पुढील ४८ तासांत थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीत लहरींमुळे महाराष्ट्रात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम आता उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबईसह किनारपट्टी भागात जाणवू लागला आहे. दरम्यान, मध्य प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये थंडीची तीव्र लाट राहणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
१२ आणि १३ नोव्हेंबर रोजी विदर्भासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत रात्रीचे तापमान लक्षणीय घटणार असून, सकाळच्या वेळी गारठा वाढेल. १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी वातावरण थंड राहील, मात्र कोणताही नवीन इशारा देण्यात आलेला नाही. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडीचा जोर वाढत असून, पहाटेच्या वेळी गार वारे, दुपारी थोडे उष्ण वातावरण आणि रात्री कडाक्याची थंडी अशी तापमानातील मोठी तफावत सध्या अनुभवायला मिळत आहे.
हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांच्या मते, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पुढील तीन दिवस हवामानात मोठे बदल होणार नाहीत, परंतु थंडीची लाट कायम राहील. सीमावर्ती राज्यांमध्ये थंडीची तीव्रता अधिक असून, तिथे ‘ऑरेंज’ आणि ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आले आहेत. ला-निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या हिवाळ्यात तापमान आणखी कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे वापरावेत आणि थंडीपासून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भारताच्या हवामानात सध्या चार सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. त्यापैकी एक उत्तर दिशेला, दुसरे दक्षिणेकडील राज्यांवर, तर उर्वरित दोन पश्चिम बंगालच्या उपसागरात स्थित आहेत. या सर्क्युलेशनमुळे समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग बदलत असून, त्याचा परिणाम वातावरणावर होत आहे.



