चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव : छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल ५ कोटी ३३ लाख ८५ हजार ३५६ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील यांच्यासह चौघांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

देवगिरी बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उन्मेष पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की, ‘उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या नावाने औद्योगिक कर्ज घेण्यात आले होते. काही काळानंतर हे कर्ज एनपीए (थकीत) झाले. बँकेने वारंवार परतफेडीसाठी संधी दिली, मात्र रक्कम परत करण्यात आली नाही. त्यानंतर बँकेने वसुलीची प्रक्रिया सुरू केली. या दरम्यान, बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी कंपनीच्या संचालकांनी संगनमताने विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कृतीमुळे बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित चार जणांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे चाळीसगाव परिसरासह जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, या घडामोडीवर विविध स्तरांतून चर्चा रंगू लागली आहे.



