चाळीसगाव : प्रतिनिधी
शहर पोलिसांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून बनावटी गावठी पिस्तूल आणि दोन राउंड जप्त केले, तसेच त्यास अटक केली. ही कारवाई १२ तारखेला मध्यरात्री करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ तारखेला रात्री २:२० वाजता पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ एक पथक नेमले. घाटरोड ते हुडको त्रिमूर्ती बेकरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एक व्यक्ती जाताना दिसल्यावर पोलिसांनी त्याला घेराव लावून ताब्यात घेतले. त्याचे नाव मयूर राजू मोरे (३०, प्रभात गल्ली, चाळीसगाव) असे असल्याचे समजले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेच्या उजव्या बाजूस शर्टाखाली ३२ हजार रुपये किमतीची बनावटी गावठी पिस्टल, त्याचा मॅगझिन आणि दोन राउंड मिळून आले. हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिसांनी पिस्तूल व राऊंड जप्त करून त्याला ताब्यात घेतले. या पथकात पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर, पोहेकॉ समीर पाटील, पोहेकॉ नीलेश पाटील, रवींद्र बच्छे, राकेश महाजन, केतन सूर्यवंशी, नरेंद्र चौधरी, ज्ञानेश्वर पाटोळे, कल्पेश पगारे, विलास पवार आणि गोपाल पाटील यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार प्रतिबंध कायदा कलम ३/२५ तसेच भारतीय दंडविधी कलम ३७(१) (३) आणि कलम १३५ यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि गणेश सायकर करत आहेत. गेल्या काही दिवसात चाळीसगाव शहर आणि परिसरात वाढती गुन्हेगारी हा एक चिंतेचा विषय झाला आहे.
