जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्रांगणात संस्थापक चेअरमन तथा माजी गृहराज्यमंत्री कै. दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे भावपूर्ण लोकार्पण गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी करण्यात आले. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्मारकाचे लोकार्पण पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या कार्याला आणि शेतकरी व दूध उत्पादकांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. या सोहळ्याला जळगाव जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण अध्यक्षस्थानी होते.

या कार्यक्रमात दूध संघाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे तसेच मुख्य दुग्धशाळेतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या आधुनिकीकरण व वाढीव क्षमता प्रकल्पाचेही उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे संस्थापकांच्या विचारांचा वारसा जपत दूध संघाने आधुनिकतेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
दादासाहेबांच्या विचारांवर दूध संघाची वाटचाल
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, दादासाहेब जे. टी. महाजन यांनी घालून दिलेल्या विचार आणि तत्त्वांच्या पाऊलखुणांवर चालत आजचा दूध संघ अधिक भक्कमपणे उभा राहिला आहे. शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी दूध संघाने केलेले कार्य कौतुकास्पद असून, स्मारकाच्या माध्यमातून दादासाहेबांच्या स्मृती सदैव प्रेरणा देत राहतील.
दूध संघाच्या इतिहासातील हा अत्यंत भावूक आणि सुवर्ण क्षण असल्याचे सांगत त्यांनी दादासाहेब हे केवळ दूध संघाचे संस्थापक नव्हते, तर हजारो शेतकरी आणि दूध उत्पादक कुटुंबांचे आधारस्तंभ होते, असे नमूद केले.
प्रशिक्षण केंद्रामुळे शेतकऱ्यांना आधुनिक मार्गदर्शन
नूतनीकरण करण्यात आलेले शेतकरी प्रशिक्षण केंद्र दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. आधुनिक दुग्ध व्यवसाय, पशुपालन, दूध उत्पादनातील गुणवत्ता, तंत्रज्ञान आणि बदलत्या बाजारपेठेच्या गरजा याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार आहे.
त्याचप्रमाणे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आधुनिकीकरण करून त्याची क्षमता वाढविण्यात आल्याने पर्यावरणपूरक आणि जबाबदार औद्योगिक व्यवस्थापनाच्या दिशेने दूध संघाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
“दादासाहेबांच्या विचारांचे खंबीर वारसदार”
अध्यक्षीय भाषणात चेअरमन आ. मंगेशदादा चव्हाण म्हणाले की, संस्थापक जे. टी. महाजन यांनी विचार आणि संघर्षाचा जो मार्ग दाखविला, तोच धागा पकडून दूध संघाची वाटचाल सुरू आहे. दूध संघ ही केवळ दूध संकलन व प्रक्रिया करणारी संस्था नसून हजारो शेतकरी आणि दूध उत्पादक कुटुंबांच्या आर्थिक जीवनाशी जोडलेली संस्था आहे.
“आम्ही दादासाहेबांचे रक्ताचे वारसदार नसलो, तरी त्यांच्या विचारांचे खंबीर वारसदार आहोत,” असे सांगत संस्थेची वाटचाल पारदर्शकपणे आणि आधुनिक पद्धतीने पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दूध उत्पादकांना योग्य मोबदला, तांत्रिक मार्गदर्शन आणि शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे हीच दूध संघाची प्रमुख दिशा राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गिरीश महाजन यांचा व्हिडिओ संदेश
कार्यक्रमाला उपस्थित राहता न आल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित केले. दादासाहेब जे. टी. महाजन यांनी दूध संघाची उभारणी केवळ एक संस्था म्हणून केली नाही, तर हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देणारा आधारवड उभा केला, असे त्यांनी सांगितले.
दादासाहेबांच्या कार्याला अभिवादन म्हणून दूध संघाच्या प्रांगणात त्यांचे भव्य स्मारक उभे राहावे, ही आपली संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. स्मारकापुरता वारसा मर्यादित न राहता दादासाहेबांचे विचार आणि शेतकरीहिताचे उपक्रम पुढे नेले जावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शरद महाजन यांनी व्यक्त केली कृतज्ञता
दादासाहेब जे. टी. महाजन यांचे चिरंजीव शरद महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना दूध संघाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दादासाहेबांनी आयुष्यभर जपलेली मूल्ये, शेतकरी आणि दूध उत्पादकांप्रती असलेली बांधिलकी तसेच दूध संघाच्या उभारणीमागील संघर्षाच्या आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या.
संस्थापकांच्या स्मृतींना दूध संघाच्या प्रांगणात कायमस्वरूपी स्थान मिळणे ही संपूर्ण कुटुंबासाठी भावनिक आणि अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास विधान परिषदेचे आ. नंदकिशोर महाजन, आ. राजूमामा भोळे, आ. अमोल जावळे, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, माजी आमदार रमेश चौधरी, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त आदित्य जीवने, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
तसेच दूध संघाचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, सभासद, दूध उत्पादक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी केली. उत्कृष्ट कार्याबद्दल अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी संजय हिंगणकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शिवानी नेवे यांनी केले, तर आभार संचालक अरविंद देशमुख यांनी मानले.
दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे लोकार्पण, शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे नूतनीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आधुनिकीकरण या तिन्ही उपक्रमांमुळे जळगाव दूध संघाच्या परंपरेला आधुनिकतेची जोड मिळाली असून, आगामी काळात शेतकरी आणि दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून संघाची वाटचाल अधिक वेगाने होणार असल्याचे या सोहळ्यातून स्पष्ट झाले.
Author: K P Chavan
thepubliclive


