Home » जळगाव » ऑनलाइन ट्रेडिंगच्या आमिषाने ₹15.40 लाखांची फसवणूक; जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

ऑनलाइन ट्रेडिंगच्या आमिषाने ₹15.40 लाखांची फसवणूक; जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव : प्रतिनिधी ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची तब्बल ₹15 लाख 40 हजारांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन, जळगाव येथे अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून “SBI Securities Back End Trading System” मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगण्यात आले. आरोपींनी विविध मोबाईल क्रमांक आणि ऑनलाइन माध्यमांचा वापर करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर “ब्लॉक ट्रेडिंग” मध्ये पैसे गुंतवण्यास सांगून वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यांमध्ये रक्कम भरण्यास प्रवृत्त करण्यात आले. फिर्यादी यांनी आरोपींच्या सांगण्यावरून एकूण ₹15,40,000/- इतकी रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा केली.
मात्र, गुंतवणुकीवरील नफा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलीस स्टेशन, जळगाव येथे तक्रार दाखल केली.
त्यानुसार अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सायबर पोलीस स्टेशन, जळगाव मार्फत सुरू आहे.
दरम्यान, नागरिकांनी ऑनलाइन गुंतवणूक, ट्रेडिंग किंवा जास्त परताव्याच्या आमिषांना बळी पडू नये तसेच कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनी किंवा संस्थेची खातरजमा करावी, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *