Home » जळगाव » ॲड. पियुष पाटील यांच्या पाठपुराव्याने वाचला मनपा मालकीचा खुला भूखंड

ॲड. पियुष पाटील यांच्या पाठपुराव्याने वाचला मनपा मालकीचा खुला भूखंड

जळगाव : शहरातील इंडियन रेड क्रॉस सोसायटी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालगत असलेल्या महानगरपालिका मालकीच्या खुल्या भूखंडावरून मोठा वाद निर्माण झाला असून सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांच्या आक्रमक पाठपुराव्यामुळे अखेर महानगरपालिकेचा या जागेवरील ताबा कायम राहिला. संबंधित जागेवर मनपाचा अधिकृत बोर्डही लावण्यात आला.

सदर जागा अनेक वर्षांपूर्वी नर्सिंग होम कॉलेजसाठी सिव्हिल हॉस्पिटलला देण्यात आली होती. मात्र, या ठिकाणी कोणतेही बांधकाम किंवा विकासकाम करण्यात आले नाही. त्यामुळे ही जागा पुन्हा जळगाव शहर महानगरपालिकेच्या ताब्यात आली होती. दरम्यान, स्थानिक युवक या खुल्या मैदानाचा खेळासाठी वापर करत होते.

काही दिवसांपूर्वी रात्रीतून या जागेची संरक्षण भिंत तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच जागेवर JCB घालून सपाटीकरण सुरू करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली. याबाबत ॲड. पियुष पाटील यांनी मनपा प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करत “हा प्रकार लँड माफियांप्रमाणे असून मनपा मालमत्तेवर कब्जा करण्याचा प्रयत्न आहे,” असा आरोप केला.

या तक्रारीनंतर मनपा प्रशासन, नगररचना विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही काळ या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या काही अधिकाऱ्यांनी ही जागा न्यायालयीन प्रकरणात असल्याचा दावा केला. मात्र, संबंधित कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने त्यांची भूमिका कमकुवत ठरली.

यावेळी ॲड. पियुष पाटील यांनी मनपाच्या मालकीची सर्व कागदपत्रे सादर करत संबंधित जागा महानगरपालिकेच्या ताब्यात असल्याचा दावा ठामपणे मांडला. अखेर प्रशासनाने जागेवर मनपा ताब्याचा बोर्ड लावत ताबा कायम ठेवला.

रात्रीतून तोडली संरक्षण भिंत

सदर जागा इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालगत असल्याने भविष्यात पार्किंगसाठी तिचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठीच रात्रीतून संरक्षण भिंत तोडून जागेत JCB घालण्यात आल्याचा दावा ॲड. पाटील यांनी केला.

यापूर्वीही झाला होता प्रयत्न

सुमारे दहा वर्षांपूर्वीदेखील या जागेवर इंडियन Red Cross Society चे गेट बसवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने तो प्रयत्न फसल्याचे सांगण्यात आले.

विनापरवानगी बांधकामाचा आरोप

संबंधित जागेवर आवश्यक मंजुरी, NOC आणि टेंडर प्रक्रिया न राबवता संरक्षण भिंतीचे काम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ॲड. पियुष पाटील यांनी महापौरांकडे निवेदन दिले आहे.

“मनपाची जागा सर्वसामान्यांसाठी खुली राहिली पाहिजे”

या वादादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने केवळ पार्किंगसाठी जागा वापरणार असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली. मात्र, “आज पार्किंगच्या नावाखाली जागा घेतली तर उद्या ती कायमस्वरूपी गमवावी लागू शकते,” असे सांगत ॲड. पाटील यांनी तीव्र विरोध दर्शवला.

यावेळी नगररचना विभागाचे अध्यक्ष अमोल पाटील, अभियंता विजय मराठे, प्रभाग अभियंता पुराणिक यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *