जळगाव | प्रतिनिधी : राज्यात गाजत असलेल्या कथित बनावट शालार्थ आयडी प्रकरणात नाशिकच्या विशेष तपास पथकाने (SIT) आणखी एक महत्त्वाची कारवाई केली आहे. सोमवारी (दि. २७) उशिरा रात्री जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील शिक्षण संस्थाचालक तसेच भाजप नेते संजय गरुड यांना सातारा जिल्ह्यातील फलटण येथून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईनंतर घोटाळ्याच्या तपासाला अधिक वेग मिळाला असून, प्रकरणातील इतर संबंधितांपर्यंत तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
याआधी या प्रकरणात जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना ताब्यात घेण्यात आले होते. शासकीय नियमांचे उल्लंघन करून २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार SIT ने पुढील तपासाची दिशा निश्चित करत संजय गरुड यांच्याविरोधात कारवाई केली.

तपास यंत्रणेच्या प्राथमिक माहितीनुसार, नियमबाह्य मान्यता मिळालेल्या अनेक शिक्षकांचा संबंध संजय गरुड यांच्या शैक्षणिक संस्थांशी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील त्यांची भूमिका तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे.
₹१६० कोटींच्या कथित गैरव्यवहाराचा तपास
या प्रकरणात बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून सुमारे ₹१६० कोटींच्या शासन निधीचा कथित अपहार झाल्याचा आरोप आहे. तपासात आतापर्यंत ४८१ संशयित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे समोर आली असून, त्यापैकी ४३८ जण जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
राजकीय चर्चांना उधाण
संजय गरुड यांनी ३० जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या ताब्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील राजकीय तसेच शैक्षणिक वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, पुढील तपासात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


