Home » जळगाव » जळगाव मनपाची मोठी कारवाई! नियमबाह्य जाहिरात फलक हटवत भंगाळे गोल्डवर प्रशासनाचा दणका

जळगाव मनपाची मोठी कारवाई! नियमबाह्य जाहिरात फलक हटवत भंगाळे गोल्डवर प्रशासनाचा दणका

जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेने शहरातील नियमबाह्य जाहिरात फलकांविरोधात मोठी कारवाई करत डिव्हायडरवर उभारण्यात आलेले भंगाळे गोल्डचे जाहिरात फलक अतिक्रमण विभागामार्फत हटवले. सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी केलेल्या लेखी तक्रारीची दखल घेत उपायुक्तांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.
महापालिकेने शहरातील विविध दुभाजक (डिव्हायडर) सुशोभीकरणासाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था (NGO) आणि उद्योजकांना करारनामा करून परवानगी दिली होती. या करारानुसार जाहिरात फलकांमध्ये किमान १० मीटरचे अंतर ठेवणे, फलकावरील ४० टक्के जागा महापालिकेच्या जनजागृती व सार्वजनिक हिताच्या संदेशांसाठी राखीव ठेवणे आणि उर्वरित ६० टक्के जागेवर संबंधित संस्था अथवा व्यावसायिकांची जाहिरात करण्याची अट घालण्यात आली होती. तसेच सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जाहिरात फलक उभारण्यापूर्वी महापालिकेची ना हरकत (NOC) घेणे बंधनकारक करण्यात आले होते.
मात्र, संबंधितांनी या नियमांचे पालन न करता १० मीटर अंतराचा निकष मोडल्याचा तसेच फलकांवर १०० टक्के स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात प्रदर्शित केल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची दखल घेत उपायुक्तांनी २४ जुलै २०२६ रोजी संबंधितांना दोन दिवसांच्या आत नियमबाह्य जाहिरात फलक स्वतःहून हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, मुदत संपल्यानंतरही संबंधितांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने अखेर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत संबंधित जाहिरात फलक हटवले.
या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्ज आणि सार्वजनिक ठिकाणांवरील नियमभंग करणाऱ्या जाहिरातींविरोधात महापालिकेने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने रुजू झालेल्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली नियमांचे काटेकोर पालन करून कायदेशीर कारवाई सुरू झाल्याची चर्चा शहरात आहे.
दरम्यान, ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी या कारवाईचे स्वागत करत, “जळगाव शहरातील सर्व नियमबाह्य जाहिरात फलक, अनधिकृत होर्डिंग्ज आणि सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणांवरही अशाच प्रकारे सातत्यपूर्ण व निष्पक्ष कारवाई व्हावी,” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *