Home » जळगाव » अमळनेर » संतापजनक! बेवारस मृतदेहाचा घंटागाडीतून अंतिम प्रवास; अमळनेर प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर संताप

संतापजनक! बेवारस मृतदेहाचा घंटागाडीतून अंतिम प्रवास; अमळनेर प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर संताप

अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर शहरात मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात आढळलेल्या एका बेवारस मृतदेहाची शवविच्छेदनानंतर दफनविधीसाठी चक्क कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाडीतून वाहतूक करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

एखाद्या शहराची ओळख केवळ विकासकामांवरून नव्हे, तर प्रशासनाच्या मानवी संवेदनशीलतेवरून ठरत असते. मात्र, अमळनेर ग्रामीण रुग्णालय परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नियमानुसार बेवारस मृतदेहाच्या सन्मानपूर्वक विल्हेवाटीसाठी किंवा दफनविधीसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करणे कचरा संकलन ठेकेदारावर बंधनकारक असताना, संबंधित ठेकेदाराने नियम धाब्यावर बसवत मृतदेह घंटागाडीतून नेल्याचा आरोप होत आहे.

या प्रकाराची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून चौकशी करण्यात येणार असून, दोषी आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

दरम्यान, शहराच्या विकासाच्या मोठ्या घोषणा करणाऱ्या प्रशासनाकडून मृत व्यक्तीलाही सन्मानाने अंतिम निरोप देता येत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *