मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार (२८ जून) रोजी राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परीक्षा परिषदेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला.
परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, शनिवारी (२७ जून) पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी एका ठिकाणी धाड टाकली. यावेळी काही संशयितांकडे टीईटी २०२६ च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी मिळते-जुळते प्रश्न आढळून आले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पडताळणी केली असता संबंधित व्यक्तींकडे असलेले काही प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात व्हावी, या भूमिकेतून २८ जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. परीक्षेची नवीन तारीख व पुढील सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहेत.
यापूर्वीही २०१८ आणि २०१९ मधील टीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकार उघडकीस आले होते. त्या प्रकरणात हजारो उमेदवारांवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा टीईटी परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


