Home » जळगाव » उपनिरीक्षकाच्या घरावर पेट्रोल हल्ल्याचा कट उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

उपनिरीक्षकाच्या घरावर पेट्रोल हल्ल्याचा कट उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

जळगाव : प्रतिनिधी

२० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिल्याने त्याचा सूड उगविण्यासाठी पोलीस निरीक्षकाच्या घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. उपनिरीक्षकाचा मेव्हणा राहुल वसंतसिंग पाटील (रा. जामनेर) याने पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश बाबुराव पाटील (रा. कळमसरा) व समाधान बळीराम निकम यांना २ लाख रुपयांची सुपारी देवून ही घटना घडवून आणल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. तसेच या संशयितांकडून चोरलेल्या ९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथे कार्यरत असलेले उपनिरीक्षक पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे आई व बहिणीसह वास्तव्यास आहे. त्यांची बहिण किरण राऊळ आणि आई घरात झोपलेल्या असतांना तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी घरावर पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुन्हा उडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, दिनेश पाटील, हेमंत पाटील, रतन गिते, जितू पाटील, ईश्वर पाटील, राहूल महाजन, सचिन घुगे, बाबासाहेब पाटील, दिनेश पाटील व सायबरचे मिलींद जाधव यांचे पथक रवाना केले.

या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार राहूल पाटील आणि त्याची पत्नी किरण राऊळ यांच्यात न्यायालयीन वाद सुरु आहे. न्यायालयाने राहुलला दरमहा २० हजार पोटगी देण्याचे आदेश दिले होते. त्याचा सूड उगविण्यासाठी राहूलने संशयित गणेश पाटील व समाधान निकम यांना दोन लाखात सुपारी दिली होती. त्यापोटी १ लाख रुपणे अगाऊ देत ही घटना घडवून आणल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले.

पथकाने सलग पाच दिवस गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये त्यांना दुचाकीवर बसलेल्या संशयिताच्या हालचालीवरुन तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती काढली. तसेच गावात येणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासले. यामध्ये संशयित गणेश पाटील व समाधान निकम यांनी शेंदुर्णी गावातील पेट्रोलपंपावरुन बाटलीमध्ये पेट्रोल घेतल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी पेट्रोलपंपावरील फुटेज ताब्यात घेतल्यानंतर गणेश पाटील याला ताब्यात घेतले.

तक्रारदार किरण राऊळ यांचा पती राहूल पाटील हा एका बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत आहे. पत्नीला पोटगी देण्याच्या कारणावरुन तिला घाबरविण्यासाठी आणि तिच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी त्याने हा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणावरुन संशयितांच्या संपर्कात असलेल्या राहूल पाटील याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपणच सुपारी देवून हा कट रचल्याचे पोलिसांना सांगितले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *