जळगाव : प्रतिनिधी
राजस्थान येथून पार्सल आल्याचे सांगून मामा-भाच्यांना चाकूचा धाक दाखवत अकोला येथे नेऊन डांबून ठेवत २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार १५ फेब्रुवारी रात्री घडला. यातील अपहरणकर्त्यांना शनिपेठ पोलिस व एलसीबीच्या पथकाने पहाटेच अकोला येथून ताब्यात घेतले. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल साहित्य विक्रीचे दुकान असलेले कृष्णकुमार डुगराराम चौधरी (३२, रा. योगेश्वर नगर) व त्यांचा भाचा गणपतलाल घेवाराम माली (१९) हे १५ रोजी संध्याकाळी घरी जात असताना त्यांना यश जितेंद्र माकोडे याने कॉल केला व तुमचे राजस्थान येथून पार्सल आल्याचे सांगून सुरुवातीला भाचा गणपतलाल याला, त्या नंतर मामा कृष्णकुमार यांना ममुराबाद रस्त्यावरील एका दुमजली इमारतीत नेले. त्या ठिकाणी चाकूचा धाक दाखवून दोघांना बांधून ठेवले. तुला मारण्याची सुपारी दिली असल्याने तुला येथे घेऊन आल्याचे यशने सांगितले. मात्र, खरे खोटे करण्यास तयार असल्याचे कृष्णकुमार याने सांगितले. त्यानंतर कृष्णकुमारला दुचाकीवर बसवून यश हा गोलाणी मार्केटकडे आला व तेथून चहा विक्री करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ममुराबाद रस्त्यावरील खोलीत डांबून ठेवलेल्या गणपतलाल याला घेऊन येण्यासाठी पाठविले. त्यानंतर दोघांनाही अकोला येथे नेले. तेथे भाच्याला सोडवायचे असल्यास २० लाख रुपये घेऊन ये, असे सांगितले. त्यानुसार मामा कृष्णकुमार हे पैसे घेण्यासाठी जळगावात आले व त्यांनी थेट शनिपेठ पोलिस ठाणे गाठले.
कृष्णकुमार चौधरी यांनी मध्यरात्री शनिपेठ पोलिस ठाण्यात आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी पोहेकाँ. अल्ताफ पठाण, प्रदीप नन्नवरे, योगेश जाधव, नवजीत चौधरी यांचे पथक रवाना केले. सोबतच स्थानिक गुन्हे शाखेच पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनाही माहिती दिली. त्यांनीही उपनिरीक्षक सोपान गोरे व कर्मचाऱ्यांचे पथक पाठविले. पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे यश माकोडे व अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले.



