Home » राष्ट्रीय » जादा भाड्याच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई, ३२ वाहने जप्त

जादा भाड्याच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई, ३२ वाहने जप्त

ठाणे : वृत्तसंस्था

जादा मासिक भाड्याचे आमिष दाखवून वाहनमालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करण्यात ठाणे गुन्हे शाखा घटक-५ ला यश आले आहे. या कारवाईत ३२ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली असून उलवे, नवी मुंबई येथील ३८ वर्षीय संदीप रघु शेट्टी याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेट्टी हा वाहनमालकांना जादा मासिक भाडे देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करत असे. त्यानंतर संबंधित वाहने ताब्यात घेऊन तीच वाहने इतरांकडे गहाण ठेवून आर्थिक व्यवहार करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. अनेक वाहनमालकांना आपली वाहने नेमकी कुठे आहेत, याची माहितीही नव्हती.

गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे नवी मुंबई, लोणावळा, पुणे (आळेफाटा), कल्याण आणि पनवेल या भागांत समन्वय साधत छापेमारी केली. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे २ कोटी ४४ लाख १५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वाहन भाड्याने देताना केवळ जादा भाड्याच्या आमिषाला बळी न पडता, समोरच्या व्यक्तीची ओळख, पत्ता आणि कागदपत्रांची सखोल पडताळणी करावी. तसेच प्रत्येक व्यवहारासाठी अधिकृत लेखी करार करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या रॅकेटमध्ये आरोपीला आणखी कोणी मदत केली का, तसेच या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार कोण, याचा तपास सुरू असून लवकरच आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *