जळगाव : प्रतिनिधी
शहरातील जुने जळगावातील भाग्यलक्ष्मी चौकात १० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता पुढे खून झाला असून तिकडे जाऊ नका, असे सांगत पोलिस असल्याची बतावणी करून तीन जणांनी कमलबाई एकनाथ सोनार (६५, रा. रामपेठ) या वृद्धेचे १ लाख ५६ हजार ९३१ रुपयांचे सोन्याचे दागिने काढून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कमलबाई सोनार या १० फेब्रुवारी रोजी भाग्यलक्ष्मी चौकात कीर्तन ऐकण्यासाठी जात होत्या. त्यावेळी एका अनोळखीने थांबविले व पोलिस खात्यातील साहेब तुम्हाला बोलावत असल्याचे सांगितले. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या साध्या वेशातील व्यक्तीकडे या वृद्धा गेल्या असता त्याने सांगितले की, पुढे खून झालेला आहे, तुम्ही तिकडे जाऊ नका. तसेच दागिने अंगावर न ठेवता काढून ठेवा असे सांगितले. वृद्धेनेदेखील त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून दिली. हातातील बांगड्या निघत नसल्याने समोरील व्यक्तीने काढण्यास मदत केली. त्यानंतर हे दागिने एका कागदात गुंडाळून वृद्धेजवळील पिशवीत ठेवले. थोड्यावेळाने वृद्धेने कागद उघडून पाहिला असता त्यात दगड निघाले.



