जळगाव | १६ मार्च प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे पर्यटन विकास प्रकल्पाच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान अचानक स्लॅब (साचा) कोसळल्याने ७ कामगार जखमी झाले असून त्यापैकी २ कामगारांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी पर्यटन विभागाकडून कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत गेल्या काही महिन्यांपासून बांधकामाचे काम सुरू आहे. दरम्यान, कामगार नियमितपणे काम करत असताना अचानक बांधकामाचा निर्माणाधीन स्लॅब कोसळला आणि काही क्षणातच परिसरात एकच गोंधळ उडाला.

या घटनेत जखमी झालेल्या ७ कामगारांना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, स्लॅब कोसळण्यामागे बांधकामातील निष्काळजीपणा किंवा तांत्रिक त्रुटी कारणीभूत आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच जिपचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
Author: K P Chavan
thepubliclive


