चोपडा | प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात रविवारी पहाटे घडलेल्या एका हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलांवर झोपेत असताना कुऱ्हाडीने निर्घृण हल्ला केल्याने १३ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर आरोपी जंगलाच्या दिशेने पसार झाला होता. अडावद पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत काही तासांतच त्याला ताब्यात घेतले.
मृत मुलीचे नाव मीरा सुभाष भिलाला (वय १३) असे असून, जखमी रामू सुभाष भिलाला (वय ११) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही मुले घरात गाढ झोपेत असताना त्यांचे वडील सुभाष गोपाळ भिलाला (वय ५०) यांनी कुऱ्हाड घेऊन त्यांच्यावर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात मीरा हिचा जागीच मृत्यू झाला, तर रामू गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवून जंगलात लपून बसलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण शोधले जात आहे.
प्राथमिक तपासात आरोपीला दारूचे व्यसन असल्याची माहिती समोर येत आहे. कौटुंबिक वाद, मानसिक अस्थिरता किंवा अन्य कोणत्या कारणातून हा प्रकार घडला का, याचा तपास पोलीस सर्व अंगांनी करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या दुर्दैवी घटनेमुळे वडती गावावर शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुरावे संकलित केले आहेत. आरोपीविरुद्ध खुनासह अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास अडावद पोलीस करीत आहेत.
Author: K P Chavan
thepubliclive


