Home » जळगाव » गॅस टंचाईचा फटका; ग्रामीण भागातील कुटुंबांवर संकट, जेवण पुन्हा चुलीवर

गॅस टंचाईचा फटका; ग्रामीण भागातील कुटुंबांवर संकट, जेवण पुन्हा चुलीवर

नशिराबाद प्रतिनिधी :जळगाव जिल्ह्यासह नशिराबाद शहर आणि परिसरात एलपीजी गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकांचे हाल होत आहेत. गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक कुटुंबांवर जेवणाचीही समस्या निर्माण झाली असून ग्रामीण भागात पुन्हा एकदा मातीच्या चुली पेटल्याचे चित्र दिसत आहे.

गॅस अभावी हॉटेल, खानावळ, चायनीज सेंटर तसेच चहा-नाश्ता विक्रेते मोठ्या अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वितरणावर तात्पुरती मर्यादा आणल्यामुळे या व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे. अनेक ठिकाणी वडापाव, अंडी-आमलेट विक्रेते तसेच लहान टपऱ्या पूर्णपणे बंद पडल्याचे दिसून येत आहे.

हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी वर्गासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गॅसला पर्याय म्हणून काही व्यावसायिकांनी पारंपरिक पद्धतींचा अवलंब करत विटा आणि मातीच्या साहाय्याने चुली तयार केल्या आहेत, तर काहींनी जळक्या ऑइलवर चालणाऱ्या शेगड्यांचा वापर सुरू केला आहे. परिस्थितीशी झुंज देत व्यवसाय टिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

विजेच्या शेगड्यांना वाढती मागणी

गॅस टंचाईमुळे नागरिकांनी आता विजेवर चालणाऱ्या इंडक्शन शेगड्यांकडे मोर्चा वळवला आहे. बाजारपेठेत या शेगड्यांची मागणी वाढली असून इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. मात्र ग्रामीण भागातील वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हा पर्याय कितपत प्रभावी ठरेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाकडे मागणी

व्यावसायिक व नागरिकांकडून प्रशासनाला मागणी करण्यात येत आहे की, व्यावसायिक गॅस सिलेंडरवरील निर्बंध त्वरित हटवावेत आणि ग्रामीण भागातील गॅस वितरणाची गती वाढवावी, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *