Home » जळगाव » जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; सलग चौथ्या वर्षी 100% यश

जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; सलग चौथ्या वर्षी 100% यश

जळगाव, दि. 2 (जिमाका) – जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत निधीच्या प्रभावी नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीमुळे जळगाव जिल्ह्याने राज्यात सलग चौथ्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूर झालेल्या ८३४ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपयांचा निधी १०० टक्के खर्च करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गिरीश महाजन, रक्षा खडसे, संजय सावकारे आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने प्रशासनाने हे यश संपादन केले आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “१०० टक्के निधी खर्च हा जनतेच्या विश्वासाचा सन्मान आहे. नियोजनबद्ध काम आणि टीमवर्कमुळे हे शक्य झाले. प्रत्येक रुपया जनतेचा असून तो योग्य ठिकाणी खर्च व्हावा, ही प्रशासनाची भूमिका राहिली आहे.”
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
जिल्ह्यासाठी मंजूर निधीपैकी ६७७ कोटी रुपये सर्वसाधारण घटकासाठी, ९३ कोटी रुपये अनुसूचित जाती घटकासाठी (SCP) आणि ६४ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपये आदिवासी घटकासाठी (TSP/OTSP) खर्च करण्यात आले. या निधीच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात विविध विकासकामांना गती मिळाली आहे.
सन २०२६-२७ साठी वाढीव निधी मंजूर
दरम्यान, सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यास ९०० कोटी ०५ लाख रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिली असून, मागील वर्षाच्या तुलनेत ६५ कोटी ४३ लाख ११ हजार रुपयांची वाढ झाली आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *