जळगाव, दि. १९ (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६ (JCL T-20) स्पर्धेत चौकार-षटकारांची अक्षरशः आतिषबाजी पाहायला मिळत आहे. दुसऱ्या सामन्यात जळगाव कोगटा किंग संघाचा फलंदाज ओम भोसले याने धडाकेबाज शतक झळकावत संघाला शानदार विजय मिळवून दिला.
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवत ओम भोसलेने अवघ्या ५८ चेंडूत १०८ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने ९ चौकार आणि ६ षटकार लगावत मैदानावर वर्चस्व गाजवले.

प्रतिस्पर्ध्यांची जोरदार सुरुवात
उद्घाटन सामन्यात मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि अशोक जैन यांच्या उपस्थितीत नाणेफेक पार पडली. चाळीसगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार ओम मुंडे (४८ चेंडूत ८१ धावा) आणि साहिल गायकर (५८ चेंडूत ८१ धावा) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर २० षटकांत १७६ धावा उभारल्या.
कोगटा किंगची एकतर्फी धाव
१७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जळगाव कोगटा किंग संघाने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली.
ओम भोसले व जितेंद्र नाईक (३३ चेंडूत ४१ धावा) याने चांगली साथ दिली. दोघांनी मिळून गोलंदाजांची धुलाई करत सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवला.
संघाने केवळ १६.४ षटकांत २ गडी गमावत लक्ष्य पूर्ण केले. शेवटी मनीष चव्हाण (९ चेंडूत १६ धावा) याने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
पुरस्कार विजेते
सामनावीर – ओम भोसले (धडाकेबाज शतक)
मोस्ट डॉट बॉल – मेहुल इंगळे (४ ओव्हर, २८ धावा, २ विकेट)
पुढील सामने
सकाळी ८:३० – चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स 🆚 जामनेर सातपुडा हिरोज
दुपारी ३:०० – जळगाव कोगटा किंग 🆚 पाचोरा एसकेटी योद्धाज
सायंकाळी ७:३० – अमळनेर सुहांस जायंट्स 🆚 रावेर रॉयल्स
Author: K P Chavan
thepubliclive


