Home » जळगाव » ८० लाखांच्या बिलासाठी १५ लाखांची मागणी; PWD शाखा अभियंता ACBच्या जाळ्यात

८० लाखांच्या बिलासाठी १५ लाखांची मागणी; PWD शाखा अभियंता ACBच्या जाळ्यात

जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) मोठ्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला असून, ८० लाख रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बिलासाठी तब्बल १५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. योगेश अभिमन्यू अहिरे असे अटक करण्यात आलेल्या शाखा अभियंत्याचे नाव असून, या कारवाईमुळे जळगाव PWD विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील विनोबा नगर परिसरात सिमेंट काँक्रीट रस्त्याचे अंदाजे ८० लाख ३१ हजार रुपयांचे काम पूर्ण करण्यात आले होते. या कामाचे सुमारे २८ लाख ४४ हजार रुपयांचे बिल मंजुरीसाठी प्रलंबित होते. हे बिल मंजूर करून देण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी संबंधित ठेकेदाराकडे १५ लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार ACB कडे करण्यात आली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB ने सापळा रचला. तडजोडीनंतर ५ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे ठरले. विशेष म्हणजे, ही रक्कम कारमधील सीटखाली ठेवण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार ACB च्या पथकाने पीडब्ल्यूडी कार्यालय परिसरात कारवाई करत ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना योगेश अहिरे याला रंगेहाथ पकडले.

तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहिरे याच्याकडे जळगाव शहरातील तब्बल १८६ कोटी रुपयांच्या सिमेंट रस्ते व समांतर रस्ते प्रकल्पांची जबाबदारी होती. स्वतःसाठी ७.५० लाख रुपये आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आणखी ७.५० लाख रुपये मागितल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

‘त्या’ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा शोध सुरू

या प्रकरणानंतर आता “वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी” मागितलेल्या पैशांचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. संबंधित वरिष्ठ अधिकारी कोण आहेत? या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याची सखोल चौकशी ACB कडून केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही अधिकारी किंवा कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कारवाईनंतर ACB ने संबंधित कार्यालय सील केले असून, मोहन नगर परिसरातील आलिशान बंगल्याचीही तपासणी करण्यात आली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ACB पथकाची कारवाई

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सापळा कारवाई पथकात

योगेश ठाकूर – पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव  रेश्मा अवतारे – पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार कॅम्प जळगाव हेमंत नागरे – पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *