जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शाखा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एसीबीने सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमधून या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून, एका नगरसेविकेच्या मुलाचा तसेच “वरिष्ठ अधिकाऱ्यांचा” संदर्भ आल्याने तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःसाठी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी प्रत्येकी ७.५० लाख रुपये मागितल्याचा उल्लेख रिमांड रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमकी भूमिका काय होती? तसेच त्यांच्याशी झालेले फोन कॉल, संपर्क आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याचबरोबर एका नगरसेविकेच्या मुलाचे नाव या व्यवहारात समोर आल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीची भूमिका काय होती, तो या व्यवहारात मध्यस्थ होता का, याचा तपास एसीबीकडून केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आरोपीकडून जप्त करण्यात आलेले मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांची तपासणी सुरू असून, या प्रकरणातून आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


