पब्लिक लाईव्ह न्यूज (प्रतिनिधी) -जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात दिनांक १५ मे ते २९ मे २०२६ या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अंतर्गत हे आदेश लागू करण्यात आले असून, अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडी, आगामी सण-उत्सव तसेच विविध थोर व्यक्तींच्या जयंती-पुण्यतिथींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.

या आदेशानुसार जिल्ह्यात शस्त्रे, दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड किंवा तत्सम वस्तू जमा करणे, सार्वजनिक ठिकाणी उत्तेजक घोषणा देणे, आक्षेपार्ह हावभाव करणे तसेच व्यक्तींच्या प्रतिमांचे दहन करणे यास बंदी घालण्यात आली आहे.
तसेच, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार असून, विनापरवानगी सभा, मोर्चे किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, शासकीय कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्न समारंभ आणि प्रेतयात्रा यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. तसेच, कर्तव्य बजावताना शस्त्र बाळगणे आवश्यक असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे
Author: K P Chavan
thepubliclive


