जळगाव | प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील कुऱ्हाडदे रस्त्यालगत असलेले सार्वजनिक शौचालय अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, त्यातून दुर्गंधी व अस्वच्छता पसरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. हे जीर्ण शौचालय तात्काळ हटवून अन्य योग्य ठिकाणी नवीन शौचालय उभारण्यात यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असून, तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
इंदिरानगर परिसरातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, शौचालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, सेफ्टी टँकमधून मैला बाहेर पडत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता वाढली असून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, या जीर्ण शौचालयालगतच खोखली मातेचे मंदिर असून आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे सध्याच्या ठिकाणी हे शौचालय ठेवणे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अयोग्य असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यापूर्वी शौचालयाच्या उघड्या खड्ड्यात एक गाय पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. ग्रामस्थांनी मोठ्या प्रयत्नांनी तिची सुटका केली होती. तरीही ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शौचालय पूर्णपणे जीर्ण झाल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून हे शौचालय हटवावे व अन्य योग्य ठिकाणी नवीन सार्वजनिक शौचालय उभारावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


