Home » महाराष्ट्र » जळगावच्या रिंग रोड विकासकामाला अखेर सुरुवात; आमदार राजूमामांच्या प्रयत्नांना यश

जळगावच्या रिंग रोड विकासकामाला अखेर सुरुवात; आमदार राजूमामांच्या प्रयत्नांना यश

जळगाव : जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान, सुरक्षित आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन रविवारी (२७ जून) बहिणाबाई उद्यानासमोरील परिसरात उत्साहात पार पडले. या विकासकामासाठी आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याने शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

भूमिपूजन कार्यक्रमाला भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, सभागृह नेते नितीन लढ्ढा, गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, शुचिता हाडा, अमित काळे, अंकिता पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, मंडल अध्यक्ष, मोर्चा व आघाडीचे पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी सांगितले की, जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार आणि रुंद रस्ते उभारणे ही काळाची गरज आहे. रिंग रोडच्या विकासामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ बनेल आणि शहराच्या विकासाला नवी गती मिळेल. तसेच शहरातील विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून आणखी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी रिंग रोड प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगत, काम उच्च दर्जाचे आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. भूमिपूजनानंतर उपस्थितांनी विकासकाम वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *