जळगाव | प्रतिनिधी : प्रधानमंत्री आवास योजना (टप्पा-१ व टप्पा-२) अंतर्गत अपूर्ण राहिलेली घरकुले पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जुलै महिन्यात विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. घरकुलासाठी मंजूर झालेल्या जागांवर झालेली अतिक्रमणे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने हटवून लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिली.
जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांची घरकुले विविध कारणांमुळे अपूर्ण आहेत. लाभार्थ्यांना त्यांचा हक्काचा पक्का निवारा मिळावा, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर स्वतः विविध ठिकाणी भेटी देऊन अपूर्ण घरकुलांची कारणे जाणून घेत आहेत.

पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी घरकुलासाठी मंजूर झालेल्या जागांवर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जुलै महिन्यात विशेष अतिक्रमण हटाव अभियान राबवून संबंधित जागा लाभार्थ्यांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
ज्या लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे, त्यांनी तातडीने आपल्या ग्रामसेवक किंवा संबंधित गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. प्रशासनाच्या समन्वयातून अतिक्रमण हटवून जागा उपलब्ध करून दिल्यानंतर घरकुलांचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, असे आवाहन करिश्मा नायर यांनी केले आहे.
या विशेष मोहिमेमुळे अतिक्रमणामुळे रखडलेली घरकुले मार्गी लागण्यास मदत होणार असून, पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पक्के घर लवकर मिळावे यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Author: K P Chavan
thepubliclive


