Home » जळगाव » २० मे रोजी औषध विक्रेत्यांचा बंद; नागरिकांनी अत्यावश्यक औषधांचा साठा करून ठेवावा – अन्न व औषध प्रशासन

२० मे रोजी औषध विक्रेत्यांचा बंद; नागरिकांनी अत्यावश्यक औषधांचा साठा करून ठेवावा – अन्न व औषध प्रशासन

जळगाव, दि. १५ (जिमाका वृत्तसेवा) – अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. २० मे २०२६ रोजी देशभरातील ठोक व किरकोळ औषध विक्री व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील अनेक औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता असून नागरिकांनी अत्यावश्यक औषधे व वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.
या बंदमुळे काही भागात औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले आहे. आपत्कालीन सेवा, शासकीय रुग्णालये तसेच काही निवडक औषध दुकाने सुरू राहण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी औषध प्रशासन व पोलीस विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी केमिस्ट बांधवांना या बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. औषधे या अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत येत असल्याने रुग्णांना औषधांचा पुरवठा न करणे हे कायद्याचे उल्लंघन ठरू शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ आणि औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले आहे.
रुग्णांना औषधांच्या अभावामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी संबंधित संघटनांनी खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने नमूद केले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत औषधे उपलब्ध न झाल्यास सहायक आयुक्त (औषधे) डॉ. प्र. भा. अस्वार (मो. ९४२२३५६१४३) व श्रीमती क. र. पाटील (मो. ९८६०१७२५६१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *