Home » महाराष्ट्र » ‘छावा’ चित्रपटातील वादग्रस्त सीन हटवला ; मंत्री सामंत

‘छावा’ चित्रपटातील वादग्रस्त सीन हटवला ; मंत्री सामंत

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित ‘छावा’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, या ट्रेलरमधील छत्रपती संभाजी महाराज नृत्य करताना दाखलेला सीनवर काहींनी आक्षेप नोंदवला होता. तसेच तो सीन काढल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता. दरम्यान, चित्रपटातील वादग्रस्त सीन हटवल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. तर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

‘छावा’ चित्रपटात अभिनेता विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत तर अभिनेत्री रश्मिका मंदाना आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला होता. ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांना एकत्र नृत्य करताना दाखवले आहे. या दृष्यावरून वादंग उठले आहे. मी स्वत: चित्रपटाच्या दिग्दर्शकांना फोन केला होता. त्यानंतर घडलेली सकारात्मक गोष्ट म्हणजे चित्रपटातील नाचण्याचा भाग त्यांनी काढून टाकला आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. तसेच नृत्य दाखवल्यावरून झालेला वाद आता थांबला असेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, चित्रपटातील या दृष्यावरून उदय सामंत यांनीही इशारा दिला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल, अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही, असे ते म्हणाले होते. दरम्यान, चित्रपटातील दृष्यावरून वाद उफळल्यानंतर आता लक्ष्मण उतेकर यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. आम्ही चित्रपटातील सीन हटवणार असल्याची उतेकर यांनी सांगितले. महाराजांपेक्षा चित्रपटातील सीन मोठा नाही, असेही ते म्हणाले.

छावा चित्रपट हा शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवर आधारीत आहे. त्यात महाराज होळीचा सण साजरा करत असल्याचे लिहिले आहे. चित्रपटात संभाजी महाराज लेझीम नृत्य करताना दाखवले आहे. लेझीम हे महाराष्ट्राचे पारंपारिक नृत्य आहे, त्यामुळे आम्हाला त्यात गैर वाटले नाही, अशी भूमिका लक्ष्मण उतेकर यांनी मांडली आहे. शिवाय यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही दिलगीरी व्यक्त करतो आणि तो सीन काढून टाकतो, असेही त्यांनी सांगितले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *