जळगाव | प्रतिनिधी : शिवाजीनगर घरकूल भूसंपादन प्रकरणातील महत्त्वाची फाईल गहाळ झाल्याच्या प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू झाला आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांच्या तपास पथकाने सोमवारी जळगाव महापालिकेच्या रेकॉर्ड रूममध्ये प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला.
तपासी अमलदार जितेंद्र तावडे आणि प्रफुल्ल धांडे यांनी पंचांच्या उपस्थितीत अभिलेख विभागाची तपासणी करत संबंधित नोंदींची पाहणी केली. यापूर्वी या प्रकरणातील मूळ कागदपत्रे जप्त झाल्यानंतर गट क्रमांक ३३७/३ अ/१ आणि ३३७/३ अ/२ संदर्भातील नवीन फाईल तयार करून ती अभिलेख विभागात सुरक्षित ठेवण्यात आली होती.

मात्र, ३१ जानेवारी २०२४ पासून न्यायालयीन कामकाजासाठी या फाईलची मागणी होत असतानाही ती उपलब्ध होत नसल्याचे रेकॉर्ड रूमकडून वारंवार कळविण्यात आले. फाईलचा शोध न लागल्याने तत्कालीन आयुक्तांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
यानंतर नगररचनाकार अमोल पाटील यांनी २ जुलै रोजी फिर्याद दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी नगररचना विभागात जाऊन अमोल पाटील यांची प्राथमिक चौकशी केली. तसेच या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे आणि आवश्यक माहिती सादर करण्यासाठी महापालिकेला अधिकृत पत्र देण्याची तयारी सुरू आहे.
गहाळ फाईल नेमकी कशी गायब झाली, त्यामागे कोणाचा सहभाग आहे, तसेच न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम करण्याचा कोणताही प्रयत्न झाला का, या सर्व बाबींचा पोलीस सखोल तपास करत आहेत.
Author: K P Chavan
thepubliclive


