चाळीसगाव | प्रतिनिधी: चाळीसगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत उपविभागीय अभियंता यथार्थ पांडुरंग निनावे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कुलदीप विरूचंद गमे यांना ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मित्राने मौजे दहिवद येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण व गावहाळचे काम पूर्ण केले होते. या कामाचे सुमारे १० लाख ४७ हजार ८४३ रुपयांचे बिल मंजूर करून मोजमाप पुस्तिकेत नोंद करण्यासाठी संबंधित फाईल उपविभागीय अभियंता यथार्थ निनावे यांच्याकडे पाठविण्यात आली होती.

तक्रारदाराने ३ जुलै रोजी निनावे यांची भेट घेतली असता, बिलाच्या एक टक्के रकमेप्रमाणे १० हजार ५०० रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आज (७ जुलै) एसीबीने सापळा रचला. तडजोडीनंतर ७ हजार रुपये लाच देण्याचे ठरले. त्यानुसार उपविभागीय अभियंता निनावे यांनी त्यांच्या दालनात ही रक्कम सहायक कुलदीप गमे यांच्या माध्यमातून स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले.
ही कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे आणि त्यांच्या पथकाने, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली.
Author: K P Chavan
thepubliclive


