जळगाव | प्रतिनिधी जळगाव-नेरी मार्गावरील उमाळा घाटाजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. रस्त्याच्या कडेला कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना न करता उभ्या करण्यात आलेल्या नादुरुस्त ट्रकला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.
या दुर्घटनेत इस्राईल शेख इरफान (वय २९, रा. अजिंठा) आणि पंकज हरीष बेंडवाल (रा. इंदूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रदीप उर्फ छोटू ओमप्रकाश परदेशी, गिरीश योगेश चव्हाण (रा. खेडी), गौरव राजू परदेशी (रा. इंदूर), अनुज रामावत परदेशी (रा. खेडी) यांच्यासह अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

प्राथमिक माहितीनुसार, बांधकाम व्यवसायानिमित्त हे सर्वजण अजिंठ्याकडे कारने जात होते. उमाळा घाटाजवळ पोहोचताच रस्त्याच्या कडेला उभा असलेला नादुरुस्त ट्रक अचानक समोर आल्याने चालकाने वाहन वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र वेगावरील नियंत्रण सुटल्याने कार प्रथम दुभाजकावर आदळली आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला जाऊन ट्रकवर धडकली.
नियमांचे उल्लंघन ठरले जीवघेणे
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ट्रक बंद पडून रस्त्यावर उभा होता. मात्र ट्रकच्या मागे रिफ्लेक्टर, चेतावणी फलक किंवा बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते. त्यामुळे अंधारात कार चालकाला ट्रक वेळेत दिसला नाही आणि हा अपघात झाला. ट्रकच्या मागील बाजूस लिहिलेला “One Mistake, Game Over” हा संदेशही घटनास्थळी चर्चेचा विषय ठरला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. मात्र रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याची माहिती समोर आली. जखमींना प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली असून, ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


