Home » जळगाव » जळगावात ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार; खानदेशात पहिलाच प्रयोग

जळगावात ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार; खानदेशात पहिलाच प्रयोग

जळगाव (प्रतिनिधी): जळगावातील अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटल अँड अॅडव्हान्स्ड स्ट्रोक सेंटरमध्ये अत्याधुनिक ‘सिल्क व्हिस्टा फ्लो डायव्हर्टर’ तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूतील ब्रेन अँन्युरिझम या गंभीर आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले. इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. निलेश किनगे व त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडत खानदेशात प्रथमच या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

तीव्र डोकेदुखी व चक्कर येण्याचा त्रास होत असल्याने संबंधित रुग्णाला अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. एमआरआय व डीएसए तपासणीनंतर रुग्णाच्या मेंदूतील मुख्य रक्तवाहिनीवर मोठा फुगा (ब्रेन अँन्युरिझम) असल्याचे निदान झाले. हा फुगा फुटल्यास मेंदूत गंभीर रक्तस्राव होऊन अर्धांगवायू किंवा जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

रुग्णाची प्रकृती लक्षात घेऊन डॉ. निलेश किनगे यांनी कोणतीही ओपन ब्रेन सर्जरी न करता मांडीतील रक्तवाहिनीद्वारे मेंदूपर्यंत पोहोचून ‘सिल्क व्हिस्टा फ्लो डायव्हर्टर’ स्टेंट बसविण्याची आधुनिक न्यूरो-इंटरव्हेन्शनल प्रक्रिया यशस्वीरीत्या केली. या स्टेंटमुळे रक्ताचा प्रवाह अँन्युरिझममध्ये न जाता मुख्य रक्तवाहिनीतून सुरळीत सुरू राहिला आणि फुगा फुटून रक्तस्राव होण्याचा धोका टळला.

यशस्वी उपचारानंतर रुग्णाची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून त्याला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान भूलतज्ज्ञ डॉ. विनोद किनगे यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

याबाबत बोलताना डॉ. निलेश किनगे म्हणाले की, “खानदेशात अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय दर्जाची न्यूरो-इंटरव्हेन्शनल सुविधा उपलब्ध झाल्याने आता रुग्णांना उपचारासाठी मुंबई, पुणे किंवा नागपूरसारख्या शहरांकडे धाव घेण्याची गरज राहणार नाही.”

दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकांनी यशस्वी उपचाराबद्दल डॉ. निलेश किनगे आणि अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय टीमचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *