September 21, 2026 5:42 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » ‘पिंप्राळ्याचा राजा’ यंदा पर्यावरणपूरक अवतारात; रौप्य महोत्सवी वर्षात २५ वर्षांची समाजसेवा कायम

‘पिंप्राळ्याचा राजा’ यंदा पर्यावरणपूरक अवतारात; रौप्य महोत्सवी वर्षात २५ वर्षांची समाजसेवा कायम

जळगाव : स्नेहल प्रतिष्ठान या नोंदणीकृत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून पारंपरिक, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदा प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून, जळगाव शहरात ‘॥ पिंप्राळ्याचा राजा ॥’ म्हणून या मंडळाची विशेष ओळख निर्माण झाली आहे.

 

जळगाव शहरातील गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेला पिंप्राळा उपनगराशी जोडणारे महत्त्वाचे माध्यम म्हणून स्नेहल प्रतिष्ठानकडे पाहिले जाते. स्थापनेपासून अजिंक्य कमलाकर देसाई मंडळाचे नेतृत्व करीत आहेत.

 

केळीच्या खोडापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

 

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्नेहल प्रतिष्ठानने सलग दुसऱ्या वर्षी जळगाव जिल्ह्याचे वैशिष्ट्य असलेल्या केळीच्या खोडापासून ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती ठाकूर ब्रदर्स यांच्या हस्ते तयार करण्यात आली आहे.

 

प्रतिष्ठानच्या माहितीनुसार, विसर्जनानंतर ही मूर्ती साधारण १२ ते १८ तासांत पाण्यात विरघळते. मूर्ती विसर्जनानंतर तिचे घटक माशांसाठी खाद्यरूपात उपलब्ध होतात, असा दावा प्रतिष्ठानकडून करण्यात आला आहे. त्यामुळे जलप्रदूषण टाळण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

 

श्रींच्या मूर्तीचे विसर्जन भावभक्तीने आणि परंपरेनुसार व्हावे, विसर्जनानंतर मूर्तीची अवहेलना होऊ नये तसेच निसर्गालाही कोणतीही हानी पोहोचू नये, हा पर्यावरणपूरक मूर्तीमागील मुख्य उद्देश असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले.

 

डीजेला फाटा; पारंपरिक वाद्यांवर आगमन व विसर्जन मिरवणूक

 

स्नेहल प्रतिष्ठानकडून गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवात डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या तालावर ‘पिंप्राळ्याचा राजा’चा आगमन सोहळा आणि सार्वजनिक विसर्जन मिरवणूक आयोजित केली जाते.

 

मागील वर्षी विसर्जन मिरवणुकीत भजनांच्या तालावर जळगावकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. तसेच महिलांना नेतृत्वाच्या संधी देण्यात येत असल्याने गणेशोत्सव आणि सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळतो.

 

२५ वर्षांपासून समाजप्रबोधन आणि सामाजिक उपक्रम

 

गणेशोत्सवाच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपासून प्रतिष्ठानतर्फे समाजप्रबोधनात्मक कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत वारकरी संप्रदायातील नामवंत ७७ कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत.

 

कीर्तन महोत्सवादरम्यान सेवा देणाऱ्या विविध वारकरी शिक्षण संस्थांना विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी सहकार्य केले जाते. धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

 

नेत्रतपासणी, रक्तदानासह विविध उपक्रम

 

स्नेहल प्रतिष्ठानतर्फे गेल्या २५ वर्षांपासून नेत्रतपासणी शिबिरे, चष्मे वाटप आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. हिवाळ्यात गरजू नागरिकांना ब्लँकेटचे वाटप, तर दिवाळीच्या काळात गरजूंना फराळ आणि मिठाईचे वाटप करण्यात येते.

 

याशिवाय जळगाव शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्येही स्नेहल प्रतिष्ठानचा सातत्याने सहभाग राहिला आहे.

 

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदाच्या गणेशोत्सवातून भक्ती, परंपरा, समाजप्रबोधन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे. २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा पुढे नेत ‘पिंप्राळ्याचा राजा’च्या माध्यमातून सामाजिक आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न यंदाही करण्यात आला आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!