जळगाव, दि. ४ प्रतिनिधी : अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये CISCE अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा-२०२६ला दिमाखदार सुरुवात झाली. रविवारी (दि. ४) अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडांगणावर झालेल्या उद्घाटन सोहळ्याने स्पर्धेची सुरुवात झाली. देशभरातील १५ संघांचे तब्बल २७० युवा क्रिकेटपटू या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले असून, ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान एकूण २५ सामने रंगणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य तथा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबाशीस दास, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे यांच्यासह ज्योती जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अशोक जैन यांच्या हस्ते अनुभूती निवासी स्कूलचा ध्वज फडकाविण्यात आला. विद्यार्थिनींनी ‘अब मुश्किल नहीं…’ हे स्वागतगीत सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एरोबिक्सच्या सामूहिक नृत्याने उपस्थितांची दाद मिळवली. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांनी मार्चपास्ट करत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
यानंतर अशोक जैन व अतुल जैन यांच्या हस्ते कृति ओसवाल हिच्याकडे क्रीडा मशाल सुपूर्द करण्यात आली. मशाल रननंतर राष्ट्रीय क्रिकेटपटू अन्मय जैन, रणवीर राणा आणि कृति ओसवाल यांच्या उपस्थितीत क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबाशीस दास यांनी सहभागी खेळाडूंना क्रीडा शपथ दिली.
यावेळी अतुल जैन यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना सांगितले की, “सांघिक भावनेने क्रिकेटचा आनंद घ्या. खेळातील विजय-पराभव महत्त्वाचा असला तरी या स्पर्धेतून मिळणाऱ्या चांगल्या आठवणी आयुष्यभर स्मरणात राहतील.”
१५ संघांतील २७० युवा खेळाडूंचा सहभाग
CISCE बोर्डाच्या अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत आंध्रप्रदेश-तेलंगणा, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर-पश्चिम भारत, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार-झारखंड, उत्तर भारत, ईशान्य भारत, केरळ, कर्नाटक-गोवा, छत्तीसगड तसेच तमिळनाडू-पुद्दुचेरी-अंदमान निकोबार या १५ संघांचा सहभाग आहे.
अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल ही या स्पर्धेची मुख्य आयोजक असून, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकार्य लाभत आहे.
२१ साखळी सामन्यांसह एकूण २५ सामने
स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये प्रत्येकी १५ षटकांचे सामने खेळविले जाणार आहेत. उपांत्य फेरी आणि अंतिम सामना प्रत्येकी २० षटकांचा असेल.
चार गटांमध्ये विभागलेल्या संघांमध्ये एकूण २१ साखळी सामने होतील. त्यानंतर दोन उपांत्य सामने, अंतिम सामना आणि तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना खेळविला जाणार आहे.
उपांत्य फेरीत ‘अ’ गटातील संघाचा ‘ड’ गटातील संघाशी, तर ‘ब’ गटातील संघाचा ‘क’ गटातील संघाशी सामना होईल. उपांत्य फेरीतील विजेते संघ अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी भिडतील, तर पराभूत संघ तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात आमनेसामने येतील.
तीन मैदानांवर क्रिकेटचा थरार
या राष्ट्रीय स्पर्धेतील सामने अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल, जैन ड्रीम स्पेस-महरुण तलावाजवळील मैदान तसेच एमके स्पोर्ट्स-सावखेडा येथील मैदानांवर खेळविले जाणार आहेत.
देशाच्या विविध भागांतून जळगावात दाखल झालेल्या युवा क्रिकेटपटूंच्या कौशल्याचा थरार जळगावकरांना अनुभवता येणार असून, आगामी तीन दिवस जळगावच्या मैदानांवर CISCE अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेची रंगत पाहायला मिळणार आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


