October 28, 2026 3:16 pm

Home » जळगाव » पाळधी-तरसोद बायपासवर पुन्हा भीषण अपघात! आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पाळधी-तरसोद बायपासवर पुन्हा भीषण अपघात! आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

 

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील पाळधी-तरसोद बायपासवरील अपघातांची मालिका सुरूच असून, पाळधी रेल्वे पुलावर आयशर मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार योगेश गजमल राक्षे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या योगेश यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश राक्षे हे आव्हाणे येथील खताच्या गोदामात मजुरीचे काम करत होते. दुचाकीवरून घरी जात असताना पाळधी रेल्वे पुलावर समोरून येणाऱ्या आयशर मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

बायपासवरील अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

 

दरम्यान, ३० जुलै रोजी आसोदा पुलाचा भराव धसल्यानंतर बायपासवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली. या पार्श्वभूमीवर बायपास आणि पर्यायी मार्गांवरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

उपलब्ध माहितीनुसार, जुलैपासून या मार्गावरील अपघातांच्या २५ घटनांची नोंद झाली असून, त्यात १३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

 

आयशर चालक पोलिसांच्या ताब्यात

 

या अपघातप्रकरणी पोलिसांनी आयशर वाहनचालक धर्मेंद्र प्रवीण सिंग गोयल याला ताब्यात घेतले आहे. या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रभावी वाहतूक नियोजन, अवजड वाहनांवर नियंत्रण आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!