अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना सुरु असतांना आता अहिल्यानगर येथील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल परिसरात वारंवार होणार्या अपघातांची मालिका टाळण्यासाठी नेहमीच पाठपुरावा करणार्या हॉटेलचालकाचाच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 5) पहाटे घडली. पांढरीपूल घाटाच्या तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक हॉटेलमध्ये घुसून अपघात घडला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहिल्यानगरवरून छत्रपती संभाजीनगरकडे लोखंडी चुरा घेऊन जाणार्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याकडेला असलेल्या हॉटेलमध्ये घुसल्याने अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली. हॉटेल मातोश्री व हॉटेल राधेश्याम भेळ सेंटर या दोन्ही हॉटेलचे देखील मोठे नुकसान झाले आहे. हॉटेल राधेश्यामचे मालक बंडू गणपत भवार (वय 50, रा. पांढरीपूल, वांजोळी ता. नेवासा) यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.
भवार हॉटेलमध्ये आवरा आवर करत असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास ट्रक अंगावर आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ट्रकने हॉटेल मातोश्रीपासून तीन दुचाकी फरपटत नेत हॉटेल राधेशामच्या भिंतीला जाऊन जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकींचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी यांनी कर्मचार्यांसह भेट दिली.
अपघातांची मालिका टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून योग्य त्या उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. अपघाताबाबत सोनई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. मृत भवार यांच्यावर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.



