रावेर : प्रतिनिधी
मध्यप्रदेशातून मजूर घेवून येणारे पिकअप वाहन उलटल्याने वाहनातील १८ जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी भालोद ते हिंगोणा जाणाऱ्या रस्त्यावर घडली. जखमींवर यावल ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शेतीकामासाठी मध्यप्रदेशातून मजूर घेवून येणारे पिकअप वाहन भालोदकडे जात होते. चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे वाहन उलटून अपघात झाला. या अपघातात शारदा मुंगीलाल बारेला (वय १०), दिपाली जगदीश बारेला (वय ८), मंगू जगदीश बारेला (वय २०), प्रमिला सयाराम बारेला (वय २१), आनंद सखाराम बारेला (५ महिने), उमेश जगदीश बारेला (वय १२ वर्ष), सखाराम गुजरिया बारीला (वय २०), ममता मांगीलाल बारेला (वय १२), संदीप मांगीलाल बारेला (वय ६), राणू मांगीलाल बारेला (वय ४), दिलीप बारेला (वय १८ वर्ष), कविता तापा बारेला ( वय ५ वर्ष), गोदीबाई बारेला (वय ४२ वर्षे), सविता बारेला (वय ४६ वर्ष) नीरसा मांगीलाल बारीला (वय ३० वर्ष), दिनेश वैद्या बारेला (वय १२) जगदीश बारेला (वय २५) यांचा समावेश आहे.
जखमींना तात्काळ यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये हिंगोणा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी, यावल रुग्णालयाचे डॉ. हर्ष पटेल, डॉ. इरफान खान, अधिपरिचारिका मंजुषा कोळेकर, संजय जधे, मनोज भोईटे या सर्वांनी तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू केले. यातील काहींना जबर दुखापत झाल्यामुळे सर्वांनाच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.



