Home » जळगाव » हृदयद्रावक : जुळ्या मुलांना जन्म देवून आईचा दुर्देवी मृत्यू !

हृदयद्रावक : जुळ्या मुलांना जन्म देवून आईचा दुर्देवी मृत्यू !

पाचोरा : प्रतिनिधी

शहरातील बाहेरपुरा भागात एक हृदयद्रावक घटना घडली. विवाहानंतर तब्बल १६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मातृत्वाचा आनंद लाभलेल्या ज्योती ज्ञानेश्वर चौधरी (वय ३७) यांचे प्रसुतीनंतर अवघ्या तीन तासांतच हृदयविकाराने निधन झाले. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

१६ वर्षांपासून अपत्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या ज्योती चौधरी यांनी १९ मार्चला दुपारी ४ वाजता सावनेकर हॉस्पिटल येथे एक गोंडस मुलगा व एक मुलगी अशा जुळ्या बाळांना जन्म दिला. त्यांच्या येण्याने संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पण अवघ्या तीन तासांत, अर्थात संध्याकाळी ७ वाजता ज्योती चौधरी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या मातृत्वाचे सुख फार काळ उपभोगू शकल्या नाहीत. दरम्यान, १६ वर्षांपासून अपत्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या पती, आई- वडील आणि कुटुंबीयांचा आनंद या घटनेमुळे एका क्षणातच दुःखात बदलला. चौधरी कुटुंबीयांनी या बाळासाठी व ज्योती चौधरी यांच्यासाठी अनेक नवस कबूल केले होते, परंतु नियतीने वेगळंच चित्र दाखवले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण बाहेरपुरा भागावर शोककळा पसरली आहे. या घटनेची आठवण अनेकांना ‘माहेरची साडी’ या मराठी चित्रपटातील हृदयस्पर्शी प्रसंगाशी करून देत आहे. ज्यात आईच्या मृत्यूनंतर चित्रपटात जुळ्या बाळांचा जन्म होतो. दरम्यान, ज्योती चौधरी यांच्यावर २० मार्चला सकाळी १० वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *