मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गीतामुळे कॉमेडियन कुणाल कामरा चांगलाच अडचणीत सापडला आहे. एकीकडे पोलिस या प्रकरणी त्याच्यावर कडक कारवाई करण्याची तयारी करत आहेत, तर दुसरीकडे शिवसैनिकांनीही त्याला धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे. त्यातच आता शिवसेना नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनीही त्याला कोणत्याही बिळात लपला तरी त्याला प्रसाद देण्याचा इशारा दिला आहे.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या एका विडंबनात्मक गाण्याचे राज्याचे वातावरण तापले आहे. या प्रकरणी शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कामराला माफी मागण्याचा अन्यथा कडक कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी कुणाल कामराला उपरोक्त इशारा दिला आहे. कुणाल कामरा कोणत्याही बिळात लपला तरी आम्ही त्याला शोधून काढू. आम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोखले आहे. अन्यथा शिवसैनिकांना त्याला रस्त्यावर खेचून प्रसाद देण्यास वेळ लागणार नाही.
कुणाल कामराने मर्यादा ओलाडंली आहे. पाणी डोक्यावरून वाहत आहे. आता त्याला प्रसाद देण्याची वेळ आली आहे. शिवसैनिकांनी त्याच्या स्टुडिओत प्रसाद दिला. आता तो मुद्दाम रोज एक नवा व्हिडिओ पोस्ट करत आहे. तो हे जाणीवपूर्वक करत आहे. त्यामुळे आता तो कोणत्याही बिळात लपला तरी त्याला तेथून बाहेर काढून रस्त्यावर पटकवले जाईल. त्याला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री दिली जाईल.
कुणाल कामराने अगोदर एकनाथ शिंदे यांची बदनामी केली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची बदनामी केली. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी चुकीचे शब्द वापरले. सुप्रीम कोर्टावरही चुकीचे विधान केले. त्यामुळे आता शिवसैनिकांनी त्याला आपल्या भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे. आम्ही मंत्री आहोत, पण तत्पूर्वी शिवसैनिक आहोत. आमची सहनशीलता आता संपली आहे. आम्ही त्याला आमच्याच भाषेत उत्तर देऊ. कामराने कुठे भेटायचे हे सांगावे. शिवसैनिक त्याला तिथे जाऊन प्रसाद देतील.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्याने ‘दिल तो पागल है’ या बॉलिवूड चित्रपटातील गाण्यावर एक विडंबन केले होते. त्याद्वारे त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केले होते. विशेषतः गद्दार म्हणत त्यांनी एकप्रकारे एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. पण त्याने आपल्या गाण्यात कुठेही त्यांचे नाव ईघेतले नव्हते. त्याच्या या व्हिडिओमुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी त्याच्या हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली होती.



