नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 30 मार्च रोजी महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, कार्यारंभ तसेच लोकार्पण करतील. 30 मार्च रोजी गुढीपाडवा आहे. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे मोदींच्या दौऱ्याची उत्सुकता महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात मोदी प्रथम नागपूरला जातील आणि सकाळी 9 वाजता स्मृती मंदिर येथे दर्शन घेतील, त्यानंतर ते दीक्षाभूमीला भेट देतील, असे पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) निवेदनात म्हटले आहे.

गुढी पाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) प्रतिपदा कार्यक्रमानिमित्त मोदी स्मृती मंदिर येथे जाऊन RSS संस्थापकांना अभिवादन करतील. ते दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करतील. याच ठिकाणी 1956 मध्ये डॉ. आंबेडकरांनी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती.
त्यानंतर पंतप्रधान माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचे भूमिपूजन करतील. या प्रकल्पात 250 खाटांचे रुग्णालय, 14 ओपीडी आणि 14 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर असतील.
ते नागपूरच्या सोलार डिफेन्स आणि एरोस्पेस लिमिटेडच्या दारूगोळा उत्पादन केंद्रालाही भेट देतील. येथे ते 1250 मीटर लांब आणि 25 मीटर रुंद धावपट्टीचे उद्घाटन करतील, जी मानवविरहित हवाई वाहनांसाठी (UAVs) तयार केली आहे. तसेच, ते लोइटरिंग म्युनिशन आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्रांच्या चाचणीसाठी नव्याने उभारलेल्या सुविधेचे उद्घाटन करतील.



